Monday, 23 January 2017

मुंबई महानगरपालिका निवडणूक : एक निरीक्षण (युतीचे गुऱ्हाळ)

सध्या मुंबई महापालिकेच्या युतीसाठी शिवसेना - भाजपा या दोन परंपरागत मित्रांमध्ये मतभेद सुरु आहेत. भाजपा म्हणते आहे, की या विधानसभेत आमची ताकद वाढली आहे, मुंबईत आमचे १५ आमदार निवडून आलेत (सेनेपेक्षा १ जास्त) त्यामुळे आम्हाला ११४ जागा द्याव्यात , तर सेना मात्र ८५ च्या वर जागा द्यायला तयार नाही.

या मतभेदाची पाळंमुळं २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत आहेत. तेव्हा भाजपानी सेनेला विधानसभेत कोणत्याही १२ जागा आम्हाला वाढवून द्याव्यात  (जिथे सेनेचा कित्येक वर्षात आमदार निवडून आला नाही अशा कोणत्याही १२) अशी मागणी केली होती. पण शिवसेना मात्र १५० च्या खाली एकही जागा लढवणार नाही असे म्हणाली. परिणामस्वरूप, युती तुटली. खरं पाहिलं तर त्यावेळी मोदीलाट किती जोरात सुरू होती, हे आपल्याला माहिती आहे. स्वबळावर शिवसेना निवडून येईल अशी मुळीच परिस्थिती नव्हती. परिणाम व्हायचा तोच झाला. शिवसेनेच्या भाजपा च्या अर्ध्या जागा निवडून आल्या.

वाऱ्याची दिशा काय आहे, पाणी कुठे वाहतं आहे हे राजकारणात समजलं पाहिजे, परिस्थिती प्रमाणे दोन पावलं मागे जाता आलं पाहिजे हे शिवसेनेला विधानसभा निवडणुकीत कळले नाही आणि त्याचेच परिणाम शिवसेनेला मुंबई महापालिकेच्या पटलावर भोगावे लागतात आहेत. त्यावेळेलाच जर कोणत्याही १२ जागा देऊन दिल्या असत्या तर शिवसेनेचे एवढे बेकार हालही झाले नसते आणि भाजपाचे एवढे आमदारही आवडून आले नसते; म्हणजेच शिवसेनेला युतीच्या वाटाघाटींमध्ये एक 'voice' राहिला असता. पण आज तशी परिस्थिती नाही.    

आज मुंबई महापालिकेत शिवसेनेचे ७६ तर भाजप चे ३० नगरसेवक आहेत. बहुमताचा आकडा ११५ आहे. आज या दोनही पक्षांनी स्वतंत्र निवडणूका लढवल्यास शिवसेना क्रमांक १ चा पक्ष म्हणून निवडून येईल असा माझा अंदाज आहे. पण बहुमताचा आकडा शिवसेना स्वबळावर पार करेल असं  वाटत नाही. म्हणजे सत्तेसाठी परत भाजपाला जवळ करावेच लागणार आहे. भाजपादेखील ३० च्या पेक्षा अधिक जागा निवडून आणेल, तो भाजपा साठी बोनसच असेल. बरं परत मागच्या दोन वर्षात शिवसेनेनी भाजपाशी संबंध बिघडवून ठेवले आहेत.

आता शिवसेनेपुढे एकच पर्याय मला तरी एकच पर्याय दिसतो आहे तो म्हणजे मनसेशी युती करणे; राज आणि उद्धव एकत्र आले याचा मुंबईकरांच्या 'emotions' वर परिणाम होऊन मुंबईची जनता शिवसेना आणि मनसे यांच्या झोळीत भरभरून मतं टाकेल. त्यातही उद्धव आणि राज यांची एक एकत्र प्रचारसभा झाली तर मग त काही विचारायलाच नको. पण तसं काही होईल असं वाटत नाही.

या सर्व परिस्थितीमुळे पुढे काय होते ते पाहणे अतिशय औत्सुक्याचे ठरणार आहे. "कालाय तस्मै नमः"!!!

No comments:

Post a Comment